
माऊली पॅनलचा एक तर एक अपक्ष उमेदवार झाला विजयी…
अमळनेर:- येथील अर्बन बँकेच्या दोन निवडणुकीत सहकार पॅनलने ११ जागा मिळवून सत्ता मिळवली. तर विरोधी माऊली पॅनलला एक जागा व एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. माजी चेअरमन व माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांचा पराभव झाला आहे.
अमळनेर शहरातील खान्देश शिक्षण मंडळ आणि अर्बन बँक राजकारणाचा पाया समजला जातो. त्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले होते. सर्व साधारण मतदार संघात प्रवीण रामलाल जैन(३९७३), पंकज गोविंद मुंदडा (३९०३), भरत कुमार सुरेश ललवाणी(३६७४), प्रदीपकुमार कुंदनलाल अग्रवाल (३५७२), दीपक छबुलाल साळी (३३२५), अभिषेक विनोद पाटील (३२४०), प्रवीण श्रीराम पाटील (३०४७) हे विद्यमान संचालक पुन्हा निवडून आले आहेत. तर अपक्ष उमेदवार लक्ष्मण पांडुरंग महाजन (३७२५) हे विजयी झाले आहेत. माजी नगरसेवक मुन्ना शर्मा व सुरेश अधिकार पाटील हे पराभूत झाले आहेत. ३११ मते बाद झाली होती.
महिला मतदार संघात सहकार पॅनल च्या वसुंधरा दशरथ लांडगे (३७४२) तर माऊली पॅनलच्या मनीषा विवेक लाठी (२५०३) या विजयी झाल्या आहेत. विद्यमान संचालिका मीराबाई निकम पराभूत झाल्या आहेत. या मतदार संघात ९३२ मते बाद झालीत. इतर मागासवर्गीय मतदार संघात विद्यमान संचालक पंडित रामचंद्र चौधरी (२९३२) हे विजयी झाले आहेत. या मतदार संघात १३५० मते बाद झालीत. सर्वाधिक चुरस अनुसूचित जाती जमाती मतदार संघात होती. यात एका जागेसाठी ९ उमेदवार रिंगणात होते. या मतदार संघात रणजित शिंदे यांना २२२६ मते मिळाली. इतर उमेदवार ८०० चा टप्पा ही गाठू शकले नाहीत. माजी नगरसेवक साहेबराव शेजवळ पराभूत झाले आहेत.या मतदार संघात १५७३ मतदार बाद झाले आहेत.भटक्या विमुक्त मतदार संघात मोहन बालाजी सातपुते (४०१०) मते मिळवून विजयी झाले आहेत.
सत्ताधारी सहकार पॅनलच्या पाठीशी अमळनेरातील धुरंदर राजकारणी माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी चेअरमन प्रवीण साहेबराव पाटील, सरजू गोकलाणी, प्रकाश मुंदडा, बजरंग अग्रवाल, कुंदन अग्रवाल, गोविंद मुंदडा, दिलीप ठाकूर, संदेश गुजराथी, अजय केले, मनोहर महाजन, सुभाष ओंकार पाटील हे पाठीशी असल्याने या पॅनलचा एकतर्फी विजय झाला. प्रतिस्पर्धी पॅनलला पुरेसे उमेदवार देखील मिळाले नाहीत. यावेळी विजयी विजयी उमेदवारांनी चांगलाच जल्लोष केला.
सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती सायंकाळी ६ पर्यंत निकाल जाहीर झाला. किरकोळ वाद वगळता मतमोजणी शांततेत झाली.







