
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील बाजारपेठेतील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात असलेल्या किराणा दुकानाला काल पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून जवळपास सात लाखांचे नुकसान झाले आहे. आगीने भीषण रूप धारण केल्याने अग्निशामक दलास पाचारण करून आग विझवण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र भगवान वाघ यांचे मारवड येथे बाजारपेठेत ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात शिव किराणा मालाचे दुकान आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री १०:१५ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. रविवारी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास ते लघुशंकेस उठले असता दुकानाच्या परिसरात धुराचा लोट घराच्या गच्चीवरून दिसला. त्यामुळे बाजारपेठेत आले असता त्यांच्या दुकानात आग लागल्याचे दिसून आल्याने त्यांनी ग्रामस्थांना बोलवून दुकानाचे शटर उघडले व ग्रामस्थांसह बादलीने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र आगीने भीषण रूप धारण केल्याने आग आटोक्यात येत नव्हती त्यामुळे अमळनेर येथून अग्निशामक दलाच्या वाहनास बोलवण्यात येवून आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व सामानाची राखरांगोळी झाली होती. या आगीत २० हजाराचे झेरॉक्स मशीन, २५ हजाराचे फ्रिज, २० हजाराची रोख रक्कम, २१ हजाराचे सीसीटीव्ही कॅमेरे व मशीन, ३.५० लाखाचे फर्निचर, ३० हजार किमतीची स्टेशनरी, १२ हजाराचे बँकेचे मशीन, ३५ हजाराचा लॅपटॉप, १५ हजाराचे अजून एक प्रिंटर, १.५२ लाखाचा किराणा माल, लॅमिनेशन मशीन, कुलर, सीलिंग फॅन, यासह एकूण ६ लाख ८९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जाळून खाक झाला आहे. लागलेली आग इतकी भीषण होती की ग्रामपंचायत इमारतीचा दुकानाकडील अर्धा भाग धुराने काळा झाला आहे. रात्री दोन तीन वेळा इलेक्ट्रिक लाईन ट्रीप झाल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
सचिन पाटील यांनी केली आर्थिक मदत…

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी मारवड येथे राजेंद्र वाघ यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यांची व्यथा ऐकल्यानंतर सचिन पाटील यांनी त्यांना दहा हजार रुपये आर्थिक मदत केली. तसेच सामाजिक संस्थांनी मदतीसाठी हात द्यावा असे आवाहन सचिन बाळू पाटील यांनी केले आहे.
दुकानाच्यावरील ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यालय सुदैवाने वाचले…

आग लागलेल्या दुकानाच्या वरच ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यालय असून त्या ठिकाणी महत्त्वाचे दस्तावेज आहेत. मात्र सुदैवाने आगीच्या झळा तिथपर्यंत पोहचल्या नाहीत अन्यथा ग्रामपंचायतीचे दप्तर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते. तसेच बाजूच्या दुकानात वाघ यांचे फ्रिज व इतर साहित्य होते मात्र ते ही थोडक्यात बचावले आहे. याठिकाणी पीएसआय विनोद पाटील, तलाठी भावसार, सरपंच, उपसरपंच यांनी भेट दिली असून आगीप्रकरणी मारवड पोलिसांत खबर देण्यात आली असून पुढील तपास पीएसआय बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.




