
१५० जणांना ताब्यात घेणाऱ्या आळंदी पोलीसांचा केला निषेध…
अमळनेर:- वारी दरम्यान चोरी करतील या संशयाने १५० जणांना ताब्यात घेणाऱ्या आळंदी पोलीसांचा निषेध करत लोकसंघर्ष मोर्चा व पारधी समाजाच्या वतीने प्रांतांधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
ब्रिटिशांनी जात गुन्हेगार ठरवलेला कायदा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर.पाटील यांनी सखोल अभ्यास करून रद्द केला असला तरी, आळंदीवरून वारी जात असतांना, वारीत चोरी करतील या संशयाने आळंदी पोलीसांनी दडपशाहीने पारधी समाजाच्या महिला, पुरुष, लहान मुले असे १५० जणांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर येत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात आळंदी पोलीसांमुळे पारधी जमातीची खूप मोठी बदनामी झाली असून, ब्रिटीश वृत्तीच्या पोलीसांनी ब्रिटिश शासन प्रमाणे मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन करीत हे कृत्य केल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण पारधी जमातीच्या भावना दुखावल्या असुन लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीसांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वये कार्यवाही करावी, यासाठी प्रांताधिकारी यांचेमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना देण्यात आले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे, जेष्ठ नेते मधुकर चव्हाण, मोतीलाल चव्हाण, बालीक पवार, अनिल (भुरा) पारधी, विजय (पिंटू) साळूंके, चेतन ठाकूर, गणेश चव्हाण, अक्षय पारधी, नरेंद्र साळूंके, वामन शिंदे यांच्यासह पारधी समाजातील कार्यकर्ते हजर होते.







