अमळनेरातील मुस्लिम समाजाने घेतला आदर्श निर्णय…
अमळनेर:- आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने आणि अमळनेर शहरातील दंगलीची पार्श्वभूमी पाहता अमळनेरातील मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी देणार नाही असा निर्णय घेतल्याने समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
शांतता समितीत डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी दोन्ही सणांचे निमित्त साधून नवीन पायंडा घालण्याचे आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात सुजाण मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर म्हणाले की, अमळनेरला फार चांगलं इतिहास आहे त्याला तडा जाऊ देऊ नका, अमळनेरची अस्मिता जपून ठेवा. ९ रोजी झालेल्या दंगलीत साडे तीन ट्रॅक्टर दगडे पालिकेने फेकली. ड्रोन कॅमेऱ्याच्या फुटेज च्या साहाय्याने दगडे असलेल्या घरांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पालिकेने ठेवावा. पोलिसांपेक्षा जनतेची पॉवर मोठी आहे पण जनतेलाच त्याचा विसर पडला आहे.प्रत्येकाने आपले स्वतःचे घर आणि आजूबाजूचे घर शांत केले तरी दंगल होणार नाही. असे आवाहनही त्यांनी केले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले की, सर्वच अपेक्षा पोलिसांकडून करण्यापेक्षा समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. दगड फेकणारा जितका दोषी आहे तितका त्याच्या डोक्यात दगड भरणारा पण आहे. यावेळी प्रा अशोक पवार, ॲड ललिता पाटील, ॲड. शकील काझी, संजय पाटील,आरिफ भाया, प्रवीण पाठक, सचिन पाटील, धनंजय सोनार, रियाज मौलाना आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय शिंदे, सूत्रसंचालन डॉ शरद पाटील आभार रणजित शिंदे यांनी मानले.