कृषी संजीवनी सप्ताहात लोण येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन…
अमळनेर:- येथील कृषी कार्यालयातर्फे दिनांक २५ जून ते १ जुलै पर्यंत तालुक्यातील विविध गावांमध्ये कृषी विभागाच्या सर्व योजना तसेच लागवडी संबंधी सर्व पिकांची माहिती देण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमात पी एम किसान योजना व सर्व कृषी विभागाच्या योजनांची माहिती व विविध प्रकल्प यांसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले जात असुन त्या अनुषंगाने काल लोण येथे कापूस पिकाची लागवडी पासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान तसेच माती नमुने काढणे उत्पादन खर्च कमी करणे याबाबत मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी सखोल मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या सर्व योजना बाबत कृषी सहाय्यक निशा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कापूस पिकांच्या वाढीसाठी राबवायच्या सर्व बाबींबाबत कृषी सहाय्यक राजेश बोरसे यांनी माहिती दिली. यावेळी कृषी पर्यवेक्षक अमोल कोठावदे, योगेश खैरनार, सरपंच कैलास पाटील, मधुकर पाटील आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.