
पुढील वर्षी २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अमळनेरात आयोजन…
अमळनेर:- ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मध्ये होणार असून या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली.
मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक रवींद्र शोभणे अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये पुढील वर्षी 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या सर्व घटक आणि संलग्न संस्थांची बैठक झाली. यावेळी महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.
मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक रवींद्र शोभणे हे मूळचे उपराजधानी नागपूरमधील आहेत. नागपूरमधील नरखेड तालुक्यातील खरसोली गावामध्ये १९५८ रोजी त्यांचा जन्म झाला. या ठिकाणी त्यांनी आदर्श विद्यालयातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण त्यानी मॉरिस महाविद्यालयातून पूर्ण केले. १९८९ मध्ये त्यांनी पी. एच.डी. प्राप्त केली. त्यांचा पहिला वर्तमान हा कथासंग्रह १९९१ मध्ये प्रकाशित झाला होता. डॉ. शोभणे यांना साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती १९९४ साली प्राप्त झाली होती. मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून २००७ ते २०१२ यादरम्यान ते कार्यरत होते. डॉ. रवींद्र शोभणे यांना त्यांच्या साहित्यसंपदेमुळे अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त झाले आहेत. २००३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
रवींद्र शोभणे यांना आजपावेतो अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. यामध्ये 1994 मध्ये साहित्य अकादमीचे प्रवासवृत्ती, नरखेड भूषण पुरस्कार 2005, सल्लागार सदस्य-साहित्य अकादमी दिल्ली मराठी भाषा (२००८ ते २०१२) सदस्य – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ (२००८ ते १२) आमंत्रक साहित्य संमेलन समिती विदर्भ साहित्य संघ (२००७ ते २०२६) विदर्भ पातळीवर एकूण १४ साहित्य संमेलनाचे आयोजन केलं आहे. सदस्य- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ असे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी साधारण दहा तीनशेहून अधिक वाड्मयीन, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमातून वक्ते, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदवला आहे.
विदर्भ साहित्य संघ नागपूर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई, आणि मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई यांचे ते आजीवन सदस्य आहेत.
विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे, ते २००३ साली पार पडले होते. जळगावमधील पाचव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. अंबाजोगाईमध्ये २०१० मध्ये झालेल्या बाराव्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. २०११ मधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २२ व्या मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. अमरावतीमधील २०१७ मधील अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तसेच २०२० मध्ये चंद्रपूरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय साहित्य आणि संस्कृती महोत्सवाचे अध्यक्षपद भूषवले होते.








