
दोन्ही गटांनी दिली एकमेकांविरुद्ध फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथे किरकोळ कारणावरून हाणामारी झाली असून दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
प्रथम फिर्यादी रामभाऊ भील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २५ रोजी ते व त्यांची पत्नी सुनंदा भील हे समाजातील मुलीचा बस्ता असल्याने गावातील इसमाच्या रिक्षा मध्ये अमळनेर येथे गेले होते. तेथून परत येताना प्रकाश सजन भील व पांडुरंग शंकर वडर यांनी मागून मोटारसायकलने येत वाद घातला. त्यानंतर फिर्यादी घरी निघून गेले. संध्याकाळी फिर्यादी कुटुंबीयांसह घरी असताना पांडुरंग वडर हा आला व शिवीगाळ करत हुज्जत घालू लागला. त्याने दगड उचलून फिर्यादीस कानाला मारले तसेच चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात फिर्यादीची भावजाई व मुलगा यांना देखील मुक्का मार लागला असून प्लास्टिक ड्रम व टाकी फुटली. यावेळी पांडुरंग याने फिर्यादिला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असून गावातील इतर लोकांनी मध्यस्ती करीत सोडवणूक केली. त्यावरून पांडुरंग शंकर भील यांच्या विरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या फिर्यादी वैजयंता शंकर भील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा पांडुरंग याला मारहाण होत असल्याची मिळाल्याने फिर्यादी त्याठिकाणी गेल्या असता त्यांचा मुलगा पांडुरंग याला रामभाऊ भील यांच्या घरातील सदस्य चापट बुक्क्यांनी मारहाण करून दगड फेकून मारत होते. त्याठिकाणी पांडुरंग याची पत्नी सुशीला व मुलगी अश्विनी वडर ह्या भांडण सोडवायला गेल्या असता त्यांना ही मारहाण करण्यात आली. यात पांडुरंग व वैजयंताबाईस मुका मार लागला असून सुशीला हिला हाताला मार लागला असून अश्विनी हिला हत्याराने पोटाला मारल्याने तिला उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले होते. त्यावरून मारवड पोलिसांत रामदास तुळशीराम भील, सुनंदा रामदास भील, दादा भील, न्हानभाऊ भील यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनांचा तपास पोहेकॉ सचिन निकम करीत आहेत.




