संदीप लोहार
पातोंडा, ता.अमळनेर:- आषाढी एकादशी निमित्ताने पातोंडा येथे दरवर्षी विठ्ठल-रुखमाई पालखी सोहळा साजरा करण्यात येत असतो.हा पालखी सोहळा” गरीबनाथ महाराज” या नावाने निघत असतो. यंदाही काल गुरुवारी रोजी “बोला गरीबनाथ महाराज कि जय ” या जयघोषाने श्री विठ्ठल रुख्माईचा पालखी सोहळा सांप्रदायिक परंपरेनुसार मोठया उत्साहात संपन्न झाला.
या पालखी सोहळयाची २५१ वर्षांपूर्वीची प्राचीन परंपरा आजही मोठ्या उत्साहात टिकून आहे. येथे पुरातन प्राचीन श्री विठ्ठल मंदिर आहे.कै. विनोद बापूराव मांडे यांच्या यांच्या नऊ पिढ्यानपासून हे मंदिर अस्तित्वात आहे.मांडे घराण्याने प्राचीनकाळी ग्रामस्थांच्या सहकार्यातून आपल्या घरातच लहान मंदिर बांधून श्री विठ्ठल देवाची प्राणप्रतिष्ठा केली होती. आजही हे मंदिर पंढरपूर विठ्ठल-रूखमाई प्रतीरुपी आहे. मंदिरात चांदीचे मुकुट असलेली सुंदर व सुरेख विठ्ठल व रुख्माई यांची मुर्ती आहे. यंदाही आषाढी एकादशी निमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणात, टाळमृदूंग व अभंगवाणीने पालखी सोहळा काढण्यात आला. पालखी मिरवणूकीला सायंकाळी पाच वाजता विठ्ठल मंदिरा पासून सुरुवात होऊन, गल्लोगल्ली व चौकाचौकातून रात्री उशिरा पर्यंत सोहळा सुरु होता. पालखीत विठ्ठल रुख्माई यांची मुर्ती ही ठेवण्यात आली होती. मिरवणूकीवेळी घराघरांतून सुहासिनी व भाविकांनी आरती देऊन व विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतात. पालखी खांद्यावर वाहून नेण्याचा मान परंपरेनुसार गावातील भोई समाज बांधवांना पार पाडला.
या कार्यक्रमाला ह.भ.प.श्री दत्त भजनी मंडळ, दक्षिणमुखी हनुमान मंडळ, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. दरवर्षी पालखी सोहळा श्री विठ्ठल मंदिराचे सेवेकरी व भक्त संदीप मांडे व परिवारातर्फे आयोजित केला जात असतो.