अमळनेर:- महापुरुषांचे विचार तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी “१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे. या उपक्रमातून नवनवीन वक्ते तयार होऊन त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळेल, असे मत गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केले. सोमवारी (ता.२६) तालुक्यात १०० वक्ते एकाच दिवशी १०० ठिकाणी भाषणे दिली. त्या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत युवा कल्याण प्रतिष्ठान व सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत अध्यक्षस्थानी होत्या. युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार, रुक्मिणीताई कला वाणिज्य महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस जे शेख, केंद्रप्रमुख साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत तालुक्यात राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक व्ही.सी पाटील, गोपाल हडपे, लता पवार, नीलिमा पाटील, सतीश बाविस्कर, प्रवीण उशीर आदींसह पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. जी पी हडपे यांनी आभार मानले. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत शाहू महाराजांचे विचार पोहचले. यावेळी अनोख्या विक्रमाची नोंद झाली, हे विशेष!
स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थिनी
प्रश्नमंजुषा स्पर्धा– प्राची पाटील, दिव्या पाटील (दहावी) निकिता पाटील, प्रतीक्षा पाटील (आठवी), देवयानी पाटील (सातवी)
वकृत्व स्पर्धा– प्रथम -प्रतीक्षा पाटील(आठवी), द्वितीय- देवयानी पाटील(सातवी), तृतीय-प्रगती पाटील(सातवी) उत्तेजनार्थ श्रेया पाटील (सातवी). परीक्षक म्हणून उमेश काटे यांनी काम पाहिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड व प्राचार्य गायत्री भदाणे यांनी कौतुक केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस जे शेख यांच्याकडून बक्षिसे देण्यात आली.