तालुक्यात पावसाळ्यात पाणीटंचाईचे सावट, ९ गावांना विहिरी केल्या अधिग्रहित…
अमळनेर:- पावसाळा सुरू झाला तरी तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाई जाणवत असल्याने तळवाडे येथे टँकर सुरू करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत. तर ९ गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
जून महिना उलटला तरी पावसाचे आगमन समाधानकारक झालेले नाही. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. नद्यांना अद्यापही पाणी आलेले नाही. परिणामी अजूनही दहा गावांना पाणी टंचाई जाणवत आहे. तळवाडे येथे तर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. तळवाडे गावाची लोकसंख्या १२६५ इतकी तर जनावरांची संख्या ४०० इतकी आहे. ग्रामस्थ इकडून तिकडून लांब अंतरावरून पाणी आणत आहेत. म्हणून ग्रामपंचायतीने टँकरच्या मागणीचा ठराव करून प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. २० लिटर प्रति याप्रमाणे ३३ हजार ३०० लिटर पाण्याची आवश्यकता होती. उपविभागीय अधिकारी खेडकर यांनी टंचाईची खात्री करून दररोज २४ हजार लिटर क्षमतेचे तीन टँकर तळवाडे येथे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे १७ किमी अंतरावरून अमळनेर पालिकेच्या विहिरीवरून टँकर भरून तळवाडे येथे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात टंचाईची समस्या मिटणार आहे.