निसर्गरम्य वातावरणात खवय्यांनी गरमागरम खाद्यपदार्थांवर मारला ताव…
अमळनेर:- आषाढी द्वादशीला शहराच्या पूर्वेला अंबर्शी टेकडीवर हजारो भाविकांनी अंबरीश राजा व विष्णुदेवाचे दर्शन घेऊन यात्रेचा आनंद लुटला.
आषाढी द्वादशीला पांडुरंग अमळनेरात येत असतात अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्ताने अंबर्शी टेकडीवर यात्रा भरते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे फुग्याच्या काकड्या हवेत किर्रर्र वाजवत जाणे. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत काकड्या वाजवण्याचा आनंद घेत असतात. टेकडीवर हजारो झाडे लावण्यात आली असून निसर्गरम्य वातावरणात विविध खाद्य पदार्थांची दुकाने, पाळणे, खेळण्याची दुकाने, शोभेच्या वस्तू, झुले यांची दुकाने लागलेली होती. थंडगार हवेत गरमागरम भजी, पाथरा, कचोरी, जिलेबीवर ताव मारण्यात आला. परंपरेप्रमाणे भगत गुरू सोनवणे यांनी घरापासून घुमत येत टेकडीवरील अंबरीश राजाच्या मंदिरावर ध्वज लावला.