कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप…
अमळनेर:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १ जुलै रोजी पंचायत समिती अमळनेर येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.
कृषी संजीवनी सप्ताह २५ जून ते १ जुलै कार्यक्रमाचा समारोपही यावेळेस करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी प्रास्ताविक करताना स्व. वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याचा जसे रोजगार हमी योजना, कृषी विद्यापीठ स्थापना, विविध धरणांची बांधणी, कोयना प्रकल्प, कापूस एकाधिकार योजना यासारख्या शेतकऱ्यांसाठी योजना त्यांनी राबविल्या याबाबत त्यांनी माहिती दिली. नंतर महाबीजच्या मोहिनी जाधव यांनी जैविक औषधे माती परीक्षण व बीज प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यांनी त्याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविली.
यावेळी पाणी फाउंडेशनचे तुषार पाटील यांनी तालुक्यातील त्यांनी केलेल्या कार्याचा सखोल अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर यांनी स्व. वसंतरावजी नाईक यांच्या योजनांचे फलित शेतकऱ्यांना दिशादर्शक आहे व ते आजही लागू पडते यावर माहिती देऊन सेंद्रिय शेती बाबत प्रत्येकास स्वतः पुढे यावे लागेल असेही सांगितले.
यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी कृषी पर्यवेक्षक अविनाश खैरनार, कृषी सहायक दिपक चौधरी, कृषी सहायक योगिता लांडगे यांना प्रतिनिधिक स्वरूपात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पीक विमा सप्ताह १ जुलै ते ७ जुलैचे उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय तृणधान्य विकास कार्यक्रम सन 2023 अंतर्गत तृणधान्यातील आहारातील महत्त्व याविषयीचा श्रीमती दिपाली सोनवणे यांनी यूट्यूब व्हिडिओ तयार केलेला असून मान्यवरांच्या हस्ते प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले व आभार प्रदर्शन दीपक चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, अमोल कोठावदे, योगेश खैरनार, भूषण पाटील यांचे सहकार्य लाभले.