दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करत गावाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा…
अमळनेर:- तालुक्यातील वासरे येथील कु. माधुरी मधुकर पाटील हीची पीएसआय पदी निवड झाली असून वासरे गावातून पहिली पीएसआय होण्याचा मान मिळवल्याने पंचक्रोशीतुन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
तालुक्यातील वासरे येथील दिवंगत प्रगतशील शेतकरी मधुकर शेनपडू पाटील (दादाभाऊ) यांची कन्या असलेल्या माधुरी हिने स्वयं अध्ययन करत हे यश मिळवले आहे. कु. माधुरी हिचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण वासरे येथे त्यानंतर माध्यमिक शिक्षण कळमसरे येथे तसेच ११ वी व १२ वी चे शिक्षण तिने प्रताप महाविद्यालयात घेतले असून त्यानतंर नगाव येथील गंगामाई अभियांत्रिकी येथे इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले.
मात्र तिला स्पर्धा परीक्षेत रस असल्याने तसेच तिने पोलीस खात्यात नोकरी मिळवावी असे तिचे वडील स्व. मधुकर पाटील यांचे स्वप्न होते. तिचे मेहुणे व वसई येथे कार्यरत असलेले पोलिस हवालदार नितीन पाटील यांचे मार्गदर्शन घेत तिने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. वसई येथे राहून लायब्ररी जॉईन करत स्वयं अध्ययन करून तिने २०२० मध्ये पीएसआय पदासाठी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल गेल्या दोन दिवसापूर्वी जाहीर झाला असून त्यात माधुरीची निवड झाल्याने तिला आनंदाश्रू अनावर झाले. तिचे वडील मधुकर पाटील यांचे मागील वर्षीच अपघातात निधन झाले होते. आज वडील हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता व अभिमान वाटला असता असे तिने बोलताना सांगितले. कु. माधुरी हीची पीएसआय पदी निवड झाल्याने संपूर्ण पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होते आहे.