
अमळनेर:- वेगवेगळ्या घटनेतील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेत गर्भवती करणाऱ्या दोन आरोपींवर अमळनेर पोलिसांत पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील जोशीपुरा येथे राहणारी १४ वर्षाची मुलगी २६ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता बिस्कीट पुडा घेण्याच्या नावाने बाहेर पडली. तिने आपल्या मैत्रिणीच्या मोबाईल वरून प्रियकर विजय बारकू भिल (वय २०) याला फोन करून संपर्क साधत त्याच्यासोबत शिरपूर येथे पळून गेली. तेथून ते लखदिरपुर ता मोरवी गुजरात येथे पळून गेले होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस पीएसआय भैय्यासाहेब देशमुख, निलेश मोरे, नम्रता जरे यांनी दोघांना मोरवी येथून ताब्यात घेतले. वैद्यकीय चाचणीत मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यावर आरोपी विजय विरुद्ध पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत जवखेडा येथील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला सुरेश दयाराम मालचे (वय ३३) याने २१ डिसेंबर २०२२ रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. दोघेही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी येथे पळून गेले होते. त्यांनी मंदिरात लग्न लावले व त्यानंतर भडाणे ता. चांदवड जिल्हा नाशिक येथे आले. आरोपी सुरेश याने त्याची पहिली पत्नी व मुलांना त्याठिकाणी बोलावून घेतले होते. पोलीस नाईक कैलास शिंदे, भूषण पाटील यांनी दोघांना चांदवड येथून ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे यांनी मुलीचा जबाब घेतला असता अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समजले. आरोपीला पोक्सो कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.







