मंत्री अनिल पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना केला खुलासा…
लवकरच सुप्रमा घेवून केंद्राकडून भरघोस निधी मिळवून धरण पूर्ण करणार:- ना. पाटील…
अमळनेर:- अजित दादांनी २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयात माझाही वाटा होता हे तुम्ही पाहिले होते मात्र त्यावेळी वरिष्ठ नेत्यांनी रिव्हर्स गियर टाकल्याने माघारी फिरावे लागले ही वस्तुस्थिती आहे असा खुलासा मंत्री अनिल पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना केला.
मंत्री अनिल पाटील प्रथमच अमळनेरात आल्यानंतर बाईक रॅली काढून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घरी आल्यानंतर त्यांचा जंगी सत्कार करण्यात येऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी अनिल पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, २०१९ ला जरी माघारी फिरावे लागले तरी सत्तेत आलो आणि अडीच वर्षात निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाला गती मिळाली. मंत्रिमंडळाच्या एक दोन बैठकीतच पाडळसरे धरणाच्या ४ हजार ८८१ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली जाईल आणि केंद्राकडून निधी आणून दीड दोन वर्षात धरण पूर्ण होईल, असेही अनिल पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस रसातळाला चालला असल्याने पक्षाला उभारी द्यायची असेल तर नवीन दमाच्या नेतृत्वाची गरज आहे म्हणून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष सह सर्व पदाधिकारी नव्याने नियुक्त केले जातील असे सांगून त्यांनी पक्षात भाकरी फिरवण्याचे संकेत दिले.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, माजी जिप सदस्य जयश्री पाटील, विनोद देशमुख,संजय पुनाजी पाटील , ऍड यज्ञेश्वर पाटील हजर होते.