
मारवड पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील धानोरा शिवारातील शेतात विहिरींवर बसवलेल्या दोन मोटरी चोरुन भंगारात विकणाऱ्या दोघांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धानोरा येथील शेतकरी रवींद्र त्रंबक शिंदे यांच्या शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी दोन मोटर बसवलेल्या आहेत. दिनांक ४ रोजी शेतात वखरणीचे काम असल्याने मजूर काम करीत होते. त्याठिकाणी गोवर्धन येथील दिनेश भिवसन मोरे व सुनील दगा सोनवणे हे दोन्ही आले व विहिरीच्या आसपास फिरत होते. ते शिकार करणारे असल्याने सदर शेतकऱ्याने त्यांना टोकले नाही मात्र दिनांक ५ रोजी रवींद्र शिंदे शेतात गेले असता त्यांना विहिरीजवळ ठेवलेल्या एकूण १३ हजार रुपये किमतीच्या दोन इलेक्ट्रिक मोटर दिसून आल्या नाहीत. सदर शेतकऱ्यास संशय आल्याने त्याने गोवर्धन गाठून दोघांना त्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी मोटर चोरल्याचे कबूल केले व त्या कोणी विकत घेत नसल्याने अमळनेर येथे ठेवल्या असून त्या आम्ही आणून देतो असे सांगितले मात्र आजपावतो त्या मोटर न मिळाल्याने रवींद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम करीत आहेत.







