पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सलग १७ तास काम करून केला पाणीपुरवठा सुरळीत…
अमळनेर:- शहराचा पाणी पुरवठा योजना असणाऱ्या जळोद येथील नदी काठावरील टेकडीची माती अतिपावसाने ढासळल्याने पाइपलाइन तुटली होती. मात्र पालिकेच्या कामगारांनी तातडीने सलग काम करून पुन्हा पाइपलाइन जोडल्याने एक दिवसाच्या विलंबाने पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे जळोद येथील तापी नदी काठावरील अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेची यंत्रणा असून टेकडीवरील माती १० रोजी सकाळी पाच वाजेला ढासळल्याने समतोल बिघडला आणि ५०० मिमी व्यासाची पाईप लाईन तुटली. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला. सर्वत्र चिखल झाला होता. पाईपलाईन जोडण्यासाठी संपूर्ण पाइपलाइन रिकामी करण्यात आली. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. पाणीपुरवठा अभियंता निलेश बैसाणे, विजय विसावे, कमरोद्दीन शेख यांच्यासह कामगारांनी रात्री दहापर्यंत सतत काम करून पाईपलाईन जोडली व काँक्रीट टाकून जमीन समतोल करण्याचा प्रयत्न केला. नदी काठावरील माती भुसभूशीत असल्याने तेथे जास्त काम करता येत नसून त्यामुळे तेथे संरक्षक भिंत बांधावी लागणार आहे. पाइपलाइन दुरुस्त केल्यानंतर ती भरण्यासाठी तीन तास लागले त्यामुळे एक दिवस उशिराने पाणीपुरवठा झाला.