
आगार व्यवस्थापकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार...
अमळनेर:- बसस्थानक परिसराच्या दोनशे मीटरच्या आत अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून पोलिसांना पत्रव्यवहार करूनही कारवाई केली जात नाही तरी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार एस टी आगार व्यवस्थापक इम्रानखान पठाण यांनी जिल्हाधिकारीना लेखी स्वरूपात दिली आहे.
अमळनेर बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वाराबाहेर अवैध प्रवासी वाहन चालक रस्त्यावर आणि बसस्थानकाच्या दोनशे मीटर आत आपली वाहने उभी करतात. आणि बसस्थानकातील प्रवासी पळवून नेतात. बसस्थानकात चोऱ्या व गैरप्रकार होऊ नयेत म्हणून पोलीस नियुक्त केला आहे. मात्र बाहेर वाहतूक पोलीसच नसल्याने बेशिस्ती वाढली आहे. काली पिली टॅक्सी चालकांना बसस्थानकाच्या भिंती शेजारी जागा उपलब्ध करून दिली असताना देखील टॅक्सी व कालिपिली कठड्यांच्या बाहेर रस्त्यावर विचित्र परिस्थितीत उभ्या केल्या जातात. तर रस्त्याच्या दुसऱ्या कडेला रिक्षा व खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन बसस्थानकातून निघणाऱ्या किंवा आत जाणाऱ्या प्रवाश्यांना त्रास होतो. अडचणीतून मार्ग काढावा लागतो. तर हा धुळे चोपडा राज्यमार्ग १५ मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने वाहनाना मार्ग काढताना अनेकदा किरकोळ अपघात होतात.
विशेष म्हणजे याठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्याचा डीव्हीआर बसस्थानकाच्या पोलीस चौकीत आहे. या कॅमेऱ्यांचा उपयोग करून अवैध प्रवासी वाहतूक अथवा बेशिस्तीवर कारवाई करता येईल मात्र तशी कोणतीही कारवाई या परिसरात होत नाही.
दरम्यान आगार व्यवस्थापकानी जिल्हाधिकारीना दिलेल्या तक्रारीत आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे. आगारात दररोज स्वच्छता केली जाते. मात्र नगरपालिका त्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावत नाही. त्यामुळे प्रवाश्यांच्या व येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ गाव स्वच्छ बसस्थानक ही मोहीम सुरू केली असल्याने नगरपालिकेस बसस्थानकातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत सूचित करावे असेही म्हटले आहे.




