उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट, अहवाल जिल्हाधिकारीना पाठवणार…
अमळनेर:- पावसाळ्यात जगाशी संपर्क तुटून गेल्या तीन वर्षात तीन जणांचा मृत्यू झालेल्या सात्री गावातील ग्रामस्थांच्या पर्यायी रस्त्याच्या मागणीला यश मिळताना दिसत असुन पर्यायी रस्त्याच्या प्रस्तावाला तापी महामंडळाकडून तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता पढार यांनी १४ रोजी तांत्रिक मान्यता दिली असून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी भेट देऊन नियोजित पर्यायी रस्त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारीना पाठवणार आहेत. स्वातंत्र्य पूर्व काळापासून सात्री गावाला बोरी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात पुरामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन तालुक्याशी संपर्क तुटत असे. पुरामुळे आरोग्य सेवा मिळू शकली नाही म्हणून तीन वर्षात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. माजी सरपंच महेंद्र बोरसे यांच्यासह ग्रामस्थांनी अनेकवेळा आंदोलने केली होती. मात्र विविध विभागांच्या तांत्रिक अडचणी अडथळा ठरत होती. सात्री कडून कलाली किंवा निंभोरा मार्गे जाण्यासाठी दऱ्या खोऱ्यातून देखील पावसाळ्यात जाता येत नव्हते. पुनर्वसन देखील होत नाही , गाव उठणार असल्याने सरकार पुलाला निधी देत नाही अशी कोंडी या गावाची झाली होती. माध्यमांनी हा प्रश्न सातत्याने उचलून धरला होता. १४ रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल अमळनेरला आले तेव्हाही हा प्रश्न महेंद्र बोरसे यांनी येणारी पूर परिस्थितीत उपाययोजना मागणी आणि समस्या मांडल्या नंतर अमन मित्तल यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनिवरून आदेश दिले. त्याच दिवशी सायंकाळी तापी महामंडळाने सात्री जुन्या गावाच्या गावठाणपासून पावणे पाच किमीच्या मार्गासाठी ४ कोटी ५६ लाख ६२ हजार ९८१ रुपये खर्चाला तांत्रिक मान्यता दिल्याने आता रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे. रस्त्याची संरेखा सक्षम अधिकाऱ्याकडून मंजूर करून नंतर निविदा प्रसिद्ध करायची असेही तांत्रिक मान्यतेच्या पत्रात म्हटले आहे.तसेच जिल्हाधिकारी मित्तल यांनी पावसाळ्यातील पूर परिस्थितीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मंगळवारी उपविभागीय कार्यालयात बैठक घेऊन त्याचा अहवाल घेऊन बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल, असे सूचित केल्याने उपविभागीय खेडकर यांनी तातडीने सुटीच्या दिवशी रविवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महेंद्र बोरसे, तलाठी वाल्मिक पाटील, तलाठी पराग पाटील व ग्रामस्थ हजर होते.