महिला हौसिंग ट्रस्टची पथनाट्यातून जनजागृती…
अमळनेर:- येथील महिला हाैसिंग ट्रस्टच्या वतीने अमळनेरकरांना पाणी अडवा पाणी जिरवा तसेच पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी पथनाट्यातुन जनजागृती करण्यात आली.
अमळनेर नगरपरिषदेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. सदर जनजागृतीसाठी महिला हाैसिंग ट्रस्टने एका कला पथकाची नेमणूक केली हाेती. शहरात गेल्या दाेन दिवसात ताडेपुरा, मुल्लाटेक, गांधलीपुरा, रुबजी नगर, मिल चाळ, रेल्वे स्टेशन , गलवाडे राेड, कुंभार टेक, शांतीनगर व तहसील कार्यालय परिसरात हे पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी संगीतमय पथनाट्यातून पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याची बचत करा, पावसाळ्यात रेन वाॅटर हाॅर्वेस्टिगचा वापर करून पावसाळ्याचे पाणी जमिनीत जिरवा, अधिकृत नळ कनेक्शन घेवून कराचा भरणा नियमित करा, दुषीत पाणी पिणे टाळा, यासह राेगराई टाळण्यासाठी हगणदारी मुक्त परिसर करा आदि विविध संदेश या पथनाट्यातून देण्यात आले. सदर पथनाट्य सुंदर पध्दतीने बसविले असल्याने यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली हाेती. अमळनेर तहसिल कार्यालय परिसरात पथनाट्य सादर करतांना नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदिप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चाैधरी, सभा लिपीक महेश जाेशी, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपक्रमशिल शिक्षक डी. ए. धनगर तसेच पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित हाेते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी महिला हाैसिंग ट्रस्टच्या सर्व स्वयंसेवक महिलांनी परिश्रम घेतले. तर न.पा.चे मुख्याधिकारी प्रशांत सराेदे यांनी ट्रस्टच्या या उपक्रमाचे काैतुक केले.