
अमळनेर :- राज्यात दि.२१ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षीप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे. मतदारांनी आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं राज्याचे मा.मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले आहे.
त्याअनुषंगाने १५ अमळनेर विधानसभा मतदारसंघात दि.२१ जुलै ते २० ऑगस्ट या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी राज्यातल्या प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटींमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैय्यक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मृत आणि स्थलांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार,मतदारांचाही शोध घेतील, तसंच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसंच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचं कामही या काळात केलं जाणार आहे.
या उपक्रमामुळे १५ अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचं आणि अद्ययावतीकरणाचं काम सुलभ होऊ शकणार आहे, तसंच हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठीची मोठी संधी आहे त्यामुळेच जेव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपलं स्वतःचं तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावं, ज्यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करून घ्यावी, मतदार यादीतील आपले वैयक्तिक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून द्यावेत, लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांनी आपली नावं बदलून घ्यावीत, स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्त्याची नोंद करून घ्यावी असं आवाहन सर्व मदारांना करण्यात येत आहे.मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्यानं, सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावं आणि विनासंकोच आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवज द्यावेत असं आवाहन त्यांनी सहाय्यक मतदान अधिकारी रूपेश कुमार सुराणा यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकामार्फत केले आहे.







