
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील बिकट परिस्थिती असलेल्या आत्महत्याग्रस्त मजुराच्या कुटुंबीयांना मारवड पोलिसांनी मदतीचा हाथ दिला असून पंचक्रोशीतून मारवड पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत तालुक्यातील धार येथील बापू दयाराम भिल याने २१ रोजी स्वतःच्या राहत्या घरी छताला साडी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपवली होती. त्याच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार असून संपूर्ण कुटुंबाची गुजराण हातमजुरीवर असल्याने वयोवृद्ध आई, पत्नी व चार मुलांवर बिकट परिस्थिती ओढवली होती. मयताच्या शवविच्छेदनावेळी ही बिकट परिस्थिती पोना सुनील तेली यांच्या लक्षात आली. पती मृत झाला आणि घरात दोन वेळचा किराणा ही नसल्याने स्वतःच्या आणि मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणापुढे हात पसरावे ह्या विवंचनेत त्याची पत्नी होती, त्या कुटुंबीयांची ही कैफियत पोना सुनील तेली यांनी सपोनि शितलकुमार नाईक यांना सुनावली असता त्यांनी मारवड पोलिसांतर्फे मदत करण्याचा निर्णय घेतला व काल दिनांक २४ रोजी धार येथे जात एका महिन्याचा किराणा ज्योती बापू भील यांना सुपूर्त केला. तसेच सपोनि नाईक यांनी रोख स्वरूपात ही मदत केली. यावेळी सपोनि शितलकुमार नाईक, पोना सुनील तेली, हेकॉ फिरोज बागवान, पत्रकार डॉ. विलास पाटील, पोलीस पाटील जगतराव पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर मयताच्या पश्चात म्हातारी आई, पत्नी व चार मुले एवढेच कुटुंब उरले असून मयताच्या वडिलांनी ही दोन वर्षापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. समाजातील दानशूर दात्यांनी ही या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन सपोनि शितलकुमार नाईक यांनी यावेळी केले आहे.







