
प्रौढाला न्यायालयाने सुनावली पाच वर्षांची शिक्षा…
अमळनेर:- कुरकुरे घेण्यासाठी गेलेली बालिका बाकी उर्वरित पैसे परत देण्यासाठी घरात आली असता तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ५० वर्षीय इसमास अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
२ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी व तिची मैत्रीण ह्या दोन्ही घरात अभ्यास करीत असतांना आरोपी संतोष मुरलीधर पाटील (वय ५० रा.देवगाव ता.पारोळा) याने पीडित मुलीला बोलावून तिला दहा रुपये दिले व दुकानावरून कुरकरे घेऊन ये असे सांगितले.पीडित मुलगी दुकानावरून एक कुरकुरे घेऊन आली व उर्वरीत पाच रुपये देण्यासाठी आरोपीकडे गेली असता आरोपीने पीडित बलिकेला घरात बोलावून घेतले व तुझे सर्व कपडे काढून तू माझ्या जवळ झोप असे सांगत हात पकडून तिला ओढू लागला.मात्र पीडित मुलीने त्याच्या हाताला चावा घेतला व त्याच्या घरातून बाहेर पळ काढला.याबाबत तिने घरी असलेल्या आजीजवळ सर्व हकीकत सांगितली. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्यात ८ साक्षीदार तपासण्यात आले होते.त्यात पीडित मुलगी,सरकारी पंच, आजी, दुकानदार व शेजारी व तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख यांची साक्ष महत्वाची ठरवत जिल्हा न्यायाधीश वर्ग १ एस बी गायधनी यांनी आरोपीस भादवी कलम ३५४ मध्ये पाच वर्षे कारावास व ५०० रुपये दंड दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा, ३५४ (अ), लैंगिक गुन्हा बाल संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८ व १२ मध्ये तीन वर्षे शिक्षा व ३०० रुपये दंड व तो न भरल्यास तीन महिने शिक्षा तसेच अनुसूचित जाती जमाती(अत्याचारास प्रतिबंध सुधारणा)अधिनियम २०१५ चे कलम ३(डब्लू)(i) नुसार ५ वर्ष शिक्षा व ५०० रुपये दंड दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील किशोर रघुनाथ बागुल यांनी युक्तिवाद केला.पैरवी अधिकारी उदयसिंह साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील, नीतीन कापडणे,राहुल रणधीर यांनी काम पाहिले.




