विजपुरवठा बंद न केल्याने आग विझवताना तिघांना बसला विजेचा झटका…
अमळनेर:- शहरातील तिरंगा चौकात दुकानाला अचानक आग लागून साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ३१ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.
भाऊसाहेब गुलाबराव महाजन यांचे तिरंगा चौकात कांचन कॉस्मेटिक व जनरल स्टोअर्सचे दुकान असून ३१ रोजी रात्री त्यांना शेजारी हेमनदास पंजाबी यांचा फोन आला की दुकानातून धूर निघत आहे. भाऊसाहेब महाजन दुकानावर पोहचले त्यांनी शटर उघडले असता आगीच्या मोठ्या ज्वाळा निघत होत्या. आगीने रौद्र रूप धारण करताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एकूण तीन बंब बोलावण्यात आले होते.
अग्निशमन दलाचे नितीन खैरनार, दिनेश बिऱ्हाडे, जफर खान, फारुख शेख, आनंदा झिम्बल, मच्छीन्द्र चौधरी, परेश उदेवाल आग विझवत होते. यावेळी वीज पूरवठा बंद करण्यासाठी वीज मंडळाला फोन करण्याचा प्रयत्न केला असता कोणीही फोन उचलला नाही. आगीत वीज जोडणी उघडी पडल्याने नितीन खैरनार, दिनेश बिऱ्हाडे व मच्छीन्द्र चौधरी यांनी पाण्याचा पाईप हातात धरला होता. उघड्या वायरवर पाण्याचा फवारा जाताच स्पार्किंग झाले आणि तिघांना विजेचा शॉक बसला. त्यानंतर काही वेळात वीज पुरवठा बंद करण्यात आला. आणि संपूर्ण आग विझवण्यात आली. दुकानातील सर्व कॉस्मेटिक व प्लास्टिक साहित्य जळून ५० हजाराचे नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे , रवींद्र पाटील यांनी भेट दिली. अमळनेर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.