नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे अमळनेरात प्रतिपादन…
अमळनेर:- ‘पेन्शन आपल्या दारी’ योजना राबवणारा जळगाव जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा असेल तसेच ‘लक्ष्मी’ योजनेतून आता प्रत्येकाच्या सात बारा वर घरातील महिलेचे नाव लावून तिला तिच्या हक्काची जाणीव करून दिली जाईल अशी माहिती नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महसूल सप्ताहानिमित्त लाभार्थ्यांना जागेवर लाभ वितरण कार्यक्रमात बोलताना दिली.
ग. स. हायस्कूल मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण , अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर चोपड्याचे उपविभागीय अधिकारी एकनाथ भंगाळे,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,तहसीलदार थोरात प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.
शेतकरी अथवा नागरिकांना विविध सात प्रकारच्या नोंदी करण्यासाठी आता तहसील अथवा तलाठी कार्यालयात चकरा मारायची गरज नसून ई हक्क प्रणालीतून ते घरबसल्या किंवा सेतू, संग्राम, आपले सरकार केंद्रावरून अर्ज करू शकतात अशीही माहिती आयुक्त गमे यांनी दिली. प्रास्ताविकातून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी अमळनेर विभागाचा आढावा मांडला. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ‛उभारी’ योजनेंतर्गत माधुरी मैराळे या महिलेस धनादेश व विविध लाभ वाटप करण्यात आले. तसेच महिलेच्या मुलांना दहावीपर्यंत मोफत शिक्षण देणाऱ्या संचालक भटू पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. स्मशानभूमी नसलेल्या खेडी गावाला शेती बक्षीस पत्र करून देणाऱ्या नरेंद्र मोतीलाल पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच ई शिधा पत्रिका, सलोखा योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना, भु विकास बँकेचा बोजा कमी करणे, मतदान कार्ड आदी लाभ देण्यात आले. माझी माती माझा देश अभियानांतर्गत माजी सैनिक ,वीर पत्नी ,वीर माता यांचाही सन्मान करण्यात आला.
विभागीय आयुक्तांकडे विविध समस्यांचे मांडले गाऱ्हाणे…
यावेळी प्रा सुभाष पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या, महेंद्र बोरसे यांनी सात्री रस्त्याच्या अडचणी मांडल्या, तर जितेंद्र ठाकूर यांनी रेशन समस्यांची तक्रार केली. कार्यक्रमास नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, संतोष बावणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, मंडळाधिकारी विठ्ठल पाटील, जगदीश पाटील, शिरीष सैंदाणे, गौरव शिरसाठ, नितीन ढोकणे, पुरुषोत्तम पाटील, संगीता घोंगडे, मुकेश काटे, संदीप पाटील, स्वप्नील कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी मानले.