
बड्या व्यावसायिकांच्या सोईसाठी पालिकेची उधळपट्टी, संदीप सोनवणे यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार…
अमळनेर:- शहरात विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत खाजगी एनए केलेल्या जागेत आणि झालेल्या सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर पुन्हा रस्ता मंजूर करण्यात आला असल्याची तक्रार संदीप सोनवणे यांनी नाशिक विभाग आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.
विशेष रस्ता अनुदानातर्गत नगरपरिषदेने खाजगी बांधकाम व्यावसायिकाने विकसित केलेल्या एनए ले आऊट जेथे त्याने प्लॉट विक्री केले आहेत. त्या खाजगी जागेमध्ये हनुमान रिसॉर्टपर्यंत रस्ता आणि गटारी साठी लाखो रुपये मंजूर केले आहेत. एकीकडे अनेक वर्षांपासून नागरिक कर भरत आहेत. त्यांना साधा चालायला रस्ता नाही, तेथे रस्ता करण्याऐवजी नगरपालिकेने खाजगी बांधकाम व्यावसायिकांचे लाड पुरवले आहेत. तसेच नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या बालाजी स्टील ते भद्रा प्रतीक मॉल पर्यंत झालेल्या रस्त्यावर २० लाख रुपये खर्च झाले असताना पुन्हा ४८ लाख रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ही कामे रद्द करून इतर प्रभागात रस्ते, गटारी, खुले भूखंड विकसित करणे, जॉगिंग ट्रॅक करणे आदी कामे करण्यात यावेत. जनतेच्या पैशाची पालिकेकडून उधळपट्टी करण्यात येत आहे. आयुक्तांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा मला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही संदीप सोनवणे यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीतून दिला आहे.




