अमळनेर:- पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या वाहनाला पोलिसांच्या गाडीने धडक दिल्याची घटना ६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अमळनेर चोपडा रस्त्यावर सिंधी कॉलनी जवळ घडली.
पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे काही कामानिमित्त चोपड्याला गेले होते. अमळनेर मार्गे ते आपल्या वाहन क्रमांक एमएच १९ सीव्ही ५००५ मधून अमळनेरमार्गे पारोळा परत जात असताना सिंधी कॉलनी जवळ असलेल्या स्पीड ब्रेकर जवळ त्यांच्या सुरक्षेसाठी असलेली पोलिसांची एस्कॉर्ट गाडी क्रमांक एमएच १९ ए ६०१७ ने मागाहून आमदार पाटील यांच्या गाडीला धडक दिली. आमदार चिमणराव पाटील त्यावेळी मोबाईल वर बोलत होते धडक लागताच त्यांच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्यांनी सीट बेल्ट लावलेला असल्याने सुदैवाने त्यांना काहीच इजा झाली नाही. क्षणभर त्यांनाही कळाले नाही की काय झाले चालकाला विचारल्यानंतर समजले की, आपल्या गाडीला मागाहून ठोकले आहे. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या स्वीय सहाय्यक, अंगरक्षक आणि एक इसमाला जोरात झटका बसल्याने डोक्याला किरकोळ मार लागला. आमदार पाटील यांच्या वाहनाचे मागच्या बाजूने नुकसान झाले. तर पोलिसांच्या गाडीच्या एयरबॅग उघडल्या होत्या. पोलिसांच्या गाडीचे पुढील बंफर तुटले. त्याचवेळी मागाहून येणाऱ्या बाजार समिती संचालक पराग पाटील याने आमदार चिमणराव पाटील यांना स्वतःच्या वाहनाने घरी सोडले.