शिक्षक संघटनांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी…
अमळनेर:- जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना ३० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी जिल्हा बँक संचालक व मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत होतात. मात्र जिल्हा बँकेत खाती असलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे खातेदाराला विमा संरक्षण नाही. शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत काढावी असे निर्देश दिले आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांची खाती जिल्हा बँकेतच आहेत. नगर जिल्ह्यात देखील जिल्हा बँकेने खातेदार कर्मचाऱ्यांना ३० लाखांचा विमा दिलेला आहे.मात्र जळगाव जिल्ह्यात विमा दिला जात नाही. तरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा बँकेने देखील विमा द्यावा अशी मागणी माध्यमिक पतपेढी संचालक तुषार बोरसे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, अरुण शिंदे, एम ए पाटील, प्रा सुरेश पाटील, साखरलाल महाजन, विनोद कदम, महेंद्र पाटील, देवेंद्र महाजन, एस आर पाटील, सचिन साळुंखे यांच्यासह शिक्षकांनी केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक तथा मंत्री अनिल पाटील यांनी हा विषय बँकेच्या बैठकीत मांडण्यात येईल असे आश्वासन दिले.