हप्तेखोरी वाढल्याने अवैध धंद्यांना आलाय ऊत…
अमळनेर:- अमळनेर शहरात पोलिसांच्याच आशीर्वादाने अवैध धंद्यांना ऊत आला आहे. जो जास्त हप्ता देईल त्याला अधिक संरक्षण देण्याचे काम पोलिसांकडूनच केले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस निरीक्षक शिंदे नव्याचे नऊ दिवस म्हणून खाकी वर्दीचा धाक दाखवला. त्यानंतर मात्र पद्धतशीरपणे अवैध धंदेवाल्यांना अभय देऊन हप्तेखोरी वाढली आहे. त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढवून अमळनेर शहर अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दंगल घडल्यास याला पोलीस जबाबदार असतील असा सूर जाणकार वर्गातून उमटू लागला आहे.
अमळनेर शहर संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी आणि पुज्य साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. शांत आणि संयमी शहर म्हणून अमळनेरची ओळख असल्याने गेल्या काही वर्षांपासून अमळनेर शहराला मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कार्यशैलीमुळे आणि हप्तेखोरीमुळे अवैध धंद्यांना ऊत येऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी निर्माण झाली आहे. सध्या शहरात सट्टा, पत्ता, जुगार, झन्ना मन्ना, सोरट, अवैध दारू आदि अवैध धंदे जोरात सुरू आहे. जो जास्त हप्ता देईल त्याची पोलिस ठाण्यात उदो उदो केली जाते. तर काहींना नंगे मारत घेऊन जाईल, असा दम पोलीस भरत आहे. त्यामुळे शहरात अवैध धंदेवाल्यांमध्ये धुसफुस सुरू आहे. तर दुसरीकडे शहरात आलबेल सुरू असल्याचे दाखवत सर्वसामान्य नागरिकांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पोलिसांकडून धूळफेक केली जात आहे.
आगामी सण, उत्सव आले धोक्यात…
शहरात 15 ऑगस्ट, गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण उत्सव लागोपाठ येणार आहेत. या सणामध्ये महिला व मुली मोठ्या संख्येने खरेदीसाठी आणि गणपती आरास नवरात्र उत्सवातील दांडियात सहभागी होण्यासाठी रात्री बाहेर पडतात. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या अवैध धंद्यांना आत्ताच ब्रेक लावला नाही तर आगामी सण उत्सव धोक्यात येऊन शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका वाढला आहे. आधीच शहराला दंगलीच्या गालबोटाने बदनाम केले आहे. तर त्यात अवैध धंदे पोलिसांच्या संरक्षणात सुरू असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
शहरातील गुन्हेगारीवर आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलीस स्टेशन अंतर्गत डीबी पथकाची नियुक्ती केली जाते. अमळनेर शहरातील डीबी पथक अशा धंद्यांवर नियंत्रण मिळवतात. परंतु ते त्यांचे खास करून ‘निमंत्रण’ घेत आहे. ते कुठे कशी तोडी करतात याची इथं भूत माहिती जाणकारांकडे आहे. स्वतःसह साहेबांच्या नावावर या पथकाने आपली वेगळी दुकानदारी सुरू केले आहे. त्यामुळे या पथकाचा अवैध धंदेवाल्यांवर कोणताही वचक राहिलेला नाही. मुळातच हप्ते घेत असल्याने वचक राहणार कसा? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे. यामुळे या पथकाची आणि पोलीस निरीक्षकांची प्रतिमा शहरात अवैध धंद्यामुळे पूर्णपणे डागळली गेली आहे. यावर वरिष्ठ अधिकारी ठोस भूमिका घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करू लागले आहे.
कोणाचीही गय केली जाणार नाही…
शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढली असेल शहरात लवकरच “वॉश आउट” मोहीम राबवली जाईल. यात कोणाचीही, अवैध धंदेवाल्यांची कोणतीही गय केली जाणार नाही.
:- सुनील नंदवाळकर,
उपविभागीय पोलिस अधिकारी, अमळनेर