अमळनेर:- तालुक्यातील खौशी येथे पक्के रस्त्यांअभावी चिखलाचे साम्राज्य पसरले असून ग्रामस्थांसह मुक्या जनावरांचेही हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ रोष व्यक्त करीत आहेत.
सद्यस्थितीत गावातील मूलभूत समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. ज्या प्रकारे स्वागत कमानी, चौक सुशोभीकरण, समाज मंदिर बांधकामाकडे लक्ष दिले जाते तसेच गाव स्वच्छता व गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अतिक्रमण वाढल्याने गल्लीतून मोठे वाहन निघत नाही अशी स्थिती आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावात मुलभूत सोयी सुविधा रस्ते, पाणी, वीज ही खरी गरज असताना नुसतेच सुशोभीकरण काय कामाचे ? जर सोयी सुविधा नसतील तर रहिवाशांनी मालमत्ता कर कां भरावा ? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गावात जेथे रस्ता आहे तेथे नाली नाही आणि जिथे नाल्यांची अत्यंत आवश्यकता आहे तिथे काम हाती घेण्यात आले नाही अशी परिस्थिती असून स्वमालकीची जागा सोडून अन्य खुल्या जागेत व रस्त्यावर उकिरडे केले जात आहेत. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. पावसाळ्यात ही समस्या अधिक बिकट बनली आहे. विकसक जागा (खुला प्लॉट) ग्रामपंचायतचे नावावर असताना त्या जागेवर देखील अतिक्रमण झाले आहे. नव्या वसाहतीत पक्के रस्ते नसल्याने रस्त्यांवर सर्वत्र चिखल होत असून येजा करणाऱ्या शेतकऱ्यांसह मुक्या जनावरांचे हाल होत आहेत. बैलगाडीचे अर्धे चाक चिखलात असते. घाणीने तुंबलेल्या नाल्यांमुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. ज्या वॉर्डांमध्ये नाल्या नाहीत अशा ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते तिथे विषारी श्वापदांचाही धोका कायम असतो. पाणी निघण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी किमान मुलभूत गरजांकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.