अमळनेर:- सोशल मीडियावर ‛बाप तो बाप होता है’ असे गाणे टाकून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवणाऱ्या पिळोदा येथील २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
गोपनीय शाखेत काम करताना सिद्धांत शिसोदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, कुंटे रोडवरील रवी ऑटो गॅरेजवर काम करणारा शोएब संमत शहा फकीर (वय २० रा पिळोदा) याने त्याच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर दोन समाजात जातीय तणाव निर्माण होईल असे स्टेटस ठेवले. त्यात त्याने बाप तो बाप रहेगा हे गाणे टाकले होते. तसेच दुसऱ्या स्टेटस ला तुझ्या सात पिढ्या गेल्या तरी एकच बाप राहील, असे लिहीत इतिहासातील दोन राजांच्याबद्दल चित्र टाकून भावना भडकवणारे संदेश टाकले होते. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, डॉ शरद पाटील,सुनील हटकर,दीपक माळी, रवींद्र पाटील, गणेश पाटील या पोलिसांना गॅरेज वर पाठवले. त्याच्या मोबाईल मधील आक्षेपार्ह मजकुराचे चित्रीकरण केले. पंचनामा करून त्याचा मोबाईल जप्त करून आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन कारवाई केल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊन होणारा अनर्थ टळला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत. ३० सेकंदाच्या स्टेटस मुळे आयुष्य बरबाद होवू शकते त्यामुळे तरुणांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.