
गुरांची गोशाळेत रवानगी, अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव खेडी रस्त्यावर विनापरवाना गुरे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी पकडले असून अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अमळगाव खेडी रस्त्यावर १२ रोजी रात्री ९ वाजता गुरांनी भरलेली पीक अप व्हॅन ग्रामस्थांनी पकडून ठेवली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे याना मिळल्यावरून हेकॉ संदेश पाटील, राहुल पाटील, अरुण बागुल, योगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिकअप व्हॅनने एका मोटरसायकल ला कट मारल्याने त्याचा पाठलाग ग्रामस्थांनी करून वाहन अडवले होते. त्याठिकाणी पीकअप व्हॅन क्रमांक (एम एच १९ सी वाय ८६३५) जवळ ग्रामस्थांनी गराडा घातला होता. त्यात तीन गोऱ्हे कोंबलेली होती. चालक वाहनाची किल्ली काढून अंधारात फरार झाला होता. कुठलाही अनर्थ अथवा जातीय दंगली घडू नयेत म्हणून पोलिसांनी पंचनामा करून वाहन आणि गुरे खाली उतरवून दुसऱ्या वाहनाने गोशाळेत रवाना करण्यात आली. पोलिसांनी गुरे वाहतुकीचा परवाना बाबत तपासणी केली असता चालकाचा शोध लागला. त्याचे नाव रोहित प्रकाश रल (रा अकुलखेडा ता चोपडा) असल्याचे सांगितले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वाहनाचा मालक गरीबदास रामदास सोनवणे (रा अकुलखेडा) असल्याचे सांगितले. तीन गुरे असा एकूण तीन लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालक व मालक यांच्याविरुद्ध बेकायदेशीररित्या कोंबून गुरांची वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.




