अमळनेर:- तालुक्यातील फाफोरे जवळील बोरी नदीवरील वळण बंधाऱ्यावरील पूर पाटचारी व दुरुस्ती कामासाठी निधी मिळावा म्हणून १५ ऑगस्ट रोजी पुकारलेले आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
फाफोरे गावाजवळील बोरी नदीवरील ब्रिटिश कालीन वळण बंधाऱ्याच्या पूर पाटचारी व त्यावरील बांधकामाच्या विशेष दुरुस्ती प्रस्तावास व अंदाजपत्रकास मान्यता मिळावी म्हणून तालुक्यातील बारा गावांचे प्रतिनिधी उपोषण करणार होते. त्यात फाफोरे बु., हिंगोणे, धार, मालपुर, अंतुर्ली, रंजाणे, अंबारे, खापरखेडे, करणखेडे, मारवड, डांगरी, आमोदे, तासखेडे या गावातील प्रतिनिधी बैलजोडी व गुराढोरांसह तहसील आवारात उपोषणास बसणार असल्याचा इशारा याआधी देण्यात आला होता. मात्र तापी महामंडळाच्या संचालकांनी त्रुटी दूर करण्याबाबतचे पत्र मंत्रालयात दिले असुन ते उपसचिवांच्या कार्यालयात पोहचले आहे. शासनाला कार्यवाहीसाठी वेळ मिळावा म्हणून १५ ऑगस्ट रोजी पुकारलेले आंदोलन तूर्तत स्थगित करण्यात आल्याचे पाझर तलाव पुनर्भरण समितीचे अध्यक्ष प्रा. गणेश पवार यांनी सांगितले आहे.