तिरंगा चौकात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ, तर डांगर येथे जवानांचा सत्कार…
अमळनेर:- स्वातंत्र्यदिनी शहरासह तालुक्यात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. शहरातील तिरंगा चौकात विद्यार्थ्यासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत मानवंदना दिली.
मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत नगरपरिषद कार्यालयात माजी सैनिक, वीर नारी यांना सन्मानित करण्यात आले. तिरंगा चौकात तिरंगा ध्वजास मानवंदना दिल्यानंतर शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थीत मान्यवर व नागरिकांनी पंचप्राण शपथ घेतली. तसेच तहसील कार्यालयात प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमळनेर पोलिस ठाण्यात तिरंगा ध्वजास मानवंदना देत पोनि विजय शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
डांगर बुद्रुक येथे १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव…
तालुक्यातील डांगर बुद्रुक येथे १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला. मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत जि. प. शाळेत लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते मायभूमीच्या मातीने भरलेल्या कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिलाफलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.त्यानंतर गावातील आजी-माजी सैनिक व पोलीस कर्मचारी, त्यांच्या परिवारातील सदस्य यांचा शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात निलेश कापडणे, किरण वाघ, योगेश कापडणे, भूषण कापडणे, दीपक पाटील, प्रमोद पाटील, चंद्रकांत खैरनार, गणेश खैरनार, निरज पाटील, संतोष सोनवणे, अनिल पाटील, सुरेश वाघ, आनंदा वाघ, स्व. भिकन पाटील यांचे प्रतिनिधी प्रशांत पाटील, स्व. धोंडू बोरसे यांचे प्रतिनिधी संपत बोरसे, स्व. सुभाष सोनवणे यांचे प्रतिनिधी जितेंद्र सोनवणे या बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर 75 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
मारवड जि.प. शाळेत ध्वजारोहण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न…
तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चंद्रकांत साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच आशाबाई भिल, उपसरपंच भिकनराव पाटील, तसेच ग्रापं. सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, कृषी सेवक व पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी समूह गीत म्हणत देशभक्तीपर भाषण दिली. ग्रामपंचायतीकडून सहभागी 34 विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यात आले. डॉ. मिंलिद खाडीलकर मित्र परिवारातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना पाट्या वाटप करण्यात आल्या.