निधीअभावी विकास खुंटल्याने धार ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांचे उपोषण…
अमळनेर:- तांत्रिक दोषामुळे धार ग्रामपंचायतिच्या सरपंच व ग्रामसेवक यांना डीएससी मिळत नसल्याने मार्च २२ पासून १५व्या वित्त आयोगाच्या रकमा अडकून पडल्या असून त्यामुळे गावाचा विकासच थांबल्याने सरपंच व उपसरपंच स्वातंत्र्य दिनी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले होते.
१५ व्या वित्त आयोगाचा पैसा डिजिटल सिग्नेचर (डी एस सी) ने देण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र धार येथील ग्रामपंचायतीची सरपंच आणि ग्रामसेवकाची डीएससी तांत्रिक अडचणींमुळे होत नसल्याने गेल्या १८ महिन्यापासून ३२ लाख ५३ हजार ६४३ रुपये बँकेत अडकून पडले आहेत. गावातील महिलांसाठी सहा सीटचे संडास अपूर्णावस्थेत पडले आहेत. पैशाअभावी ते काम पूर्ण करता येत नाही. महिला उघड्यावर शौचास बसत आहेत. गावहाळ बांधून पूर्ण करून ठेकेदाराला त्याचे बिल अदा करता येत नाही. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३० टक्के रक्कम ग्रामपंचायतीने भरल्यास ७० टक्के निधी मिळतो. मात्र डीएससीमुळे पैसे काढता येत नाही. ३० टक्के रक्कम भरता येत नाही म्हणून तो निधी देखील ग्रामपंचायतीला मिळत नसल्याने स्वच्छता अभियान देखील राबवत येत नाही. म्हणून सरपंच दगडू सैंदाने, उपसरपंच शशिकांत बोरसे, राजेंद्र पाटील (राज टेलर) हे १५ ऑगस्ट रोजी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले होते. त्यानंतर तहसीलदार व बीडीओंनी पाच दिवसात ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.