चार तासांच्या प्रयत्नांनी सापडला तरूणाचा मृतदेह…
अमळनेर:- तालुक्यात गलवाडे रस्त्यावरील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या व पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या १७ वर्षीय तरूणाचा मृतदेह चार तासांच्या अथक प्रयत्नांनी शोधून काढला आहे.
पारोळा येथील बालाजी प्लॉट भागातील रहिवाशी असलेले विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा शिक्षणासाठी अमळनेर येथे राहत होता. प्रताप महाविद्यालय इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता. दिनांक १६ रोजी तो दुपारी त्याच्यासोबत चार पाच मित्रांसह तो विहिरीत पोहायला गेला होता. विहीरीत उडी मारल्यावर तो वर आला नाही. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर ही पोलीस घटनास्थळी पोहचले व स्थानिक पोहणाऱ्याना बोलवून मृतदेहाचा शोध घेवू लागले, तसेच एमडीआरएफची टीम ही याठिकाणी पोहचली. मात्र तरीही मृतदेह मिळून येत नसल्याने रात्री दहा वाजता पट्टीचा पोहणारा असलेला व दिव्यांग असलेल्या हिरालाल श्रावण भील याने ७० फूट खोलावरून हा मृतदेह बाहेर काढला. मारवड पोलीस ठाण्याचे एपिआय शितलकुमार नाईक व सहकारी पूर्णवेळ थांबून होते.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोध व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.पुनवर्सन मंत्र्यांनी तरुणांच्या कुटुंबाचे दूरध्वनीवरून सांत्वन केले आहे. मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो सचिन निकम हे करीत आहेत.