अमळनेर:- शहरातील बहुचर्चित लालबाग शॉपिंग सेंटरचा जीर्ण झालेला स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला, यात भाजी विकणारी एक महिला थोडक्यात बचावली आहे.
गुरुवारी दुपारी अडीच वाजता शहरातील लालबाग शॉपिंग सेंटरची मागील बाजूची पडदीचा जीर्ण झालेला स्लॅब अचानक कोसळला. स्लॅब खाली भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेने प्रसंगावधान राखत पटकन जागा बदलली अन्यथा अनर्थ घडला असता. पालिकेच्या मालकीच्या असलेल्या या शॉपिंग सेंटरच्या बांधकामाला सुमारे 40 वर्ष उलटले आहेत. त्याची साधी डागडुजी देखील होत नसल्याने स्लॅब जीर्ण झाला आहे तर मागील बाजूची पदडीदेखील जीर्ण झाली आहे. लालबाग शॉपिंग सेंटरच्या विजय मेडिकल कडील प्रवेशद्वारातून प्रवेश केला असता आत मध्ये कोशिंबीर विक्रेते दोन्ही बाजूला बसलेले असतात. त्याच ठिकाणी वरून हा स्लॅब कोसळला आहे. त्याखाली रेखाबाई भगवान पाटील ही महिला भाजीपाला विकत होती. सुदैवाने त्या महिलेला कोणताही इजा झाली नाही. याच प्रवेशद्वारातून शेकडो ग्राहक भाजीपाला घेण्यासाठी जात येत असतात. त्यामुळे नगर परिषदेने त्यांच्या जीवाशी न खेळता तात्काळ जीर्ण झालेला भागाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना याबाबत विचारले असता त्यांनी बांधकाम अभियंत्यांना पाठवून पाहणी करू आणि जीर्ण झालेला भाग तात्काळ दुरुस्ती करू असे सांगितले आहे.