रुद्र तांडव नृत्य आणि ५० मीटर भव्य लेझर शो यंदाचे खास आकर्षण…
अमळनेर:- येथील गांधलीपुरा परिसरातील श्रीराम मंदिर युवा ग्रुप तर्फे दिनांक ७ रोजी सायंकाळी गोगादेव नवमी निमित्त भव्य छडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिल्ली येथील रुद्र तांडव नृत्य आणि ५० मीटर भव्य लेझर शो यंदाचे खास आकर्षण असणार आहे.
अमळनेरातील गोगादेव नवमी उत्सव हा हिंदू मुस्लिम तसेच सर्व जाती धर्माच्या ऐक्याचा उत्सव असतो. यादिवशी बाबासाहेब आंबेडकर चौकात यात्रेचे स्वरूप आलेले असते. विविध प्रकारच्या छडी मिरवणुकीचे आयोजन मायाबाई लोहरे आणि संतोष लोहरे यांनी केले आहे. छडी मध्ये घटोत्कच व कर्णाचे घनघोर युद्धाचा भव्य देखावा साकारण्यात आला असून भक्त ती वजनदार छडी हातात घेऊन नाचणार आहेत. यावर्षी खास दिल्लीहून रुद्र तांडव नृत्याचे पथक मागवण्यात आले आहे. तर ४०० फूट लांब, २५ फूट रुंद आणि २० फूट उंच आकाराच्या मंडपात विविध प्रकारचा लेझर शो आयोजित केला आहे. ही दोन्ही दृश्य यंदाच्या मिरवणुकीचे खास आकर्षण असणार आहे. राममंदिर, लक्ष्मी टॉकीज ,पाच कंदील चौक, मुंबई गल्ली, वीज मंडळ कार्यालय,सुभाष चौक व परत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असा मिरवणुकीचा मार्ग असेल. सर्व नागरिकांनी या जातीय सलोख्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम युवा ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.