मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी नुकताच केला सपत्नीक सत्कार…
अमळनेर:- तालुक्यातील सात्री येथील विनोद बोरसे यांनी इतर नोकऱ्यांना झुगारून गावाच्या सेवेसाठी तोडक्या मानधनावरची पोलीस पाटलांची नोकरी स्वीकारली आहे.
तालुक्यातील सात्री येथील रहिवासी व सेवानिवृत्त जवान विनोद बोरसे आफ्रिकेत शांती सेनेत नोकरी केली असून या माजी सैनिकाने इतर नोकऱ्यांना झुगारून गावाच्या सेवेसाठी तोडक्या मानधनावरची पोलीस पाटलांची नोकरी स्वीकारली आहे. सात्री येथील नवनियुक्त पोलीस पाटील माजी सैनिक विनोद बोरसे यांचा मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी नुकताच सत्कार केला आहे. विनोद बोरसे हे गेल्या वर्षी सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांना माजी सैनिक म्हणून इतर ठिकाणी नोकरी मिळू शकत होती. साधा सुरक्षा रक्षक म्हणून देखील त्याना मासिक पंधरा ते सोळा हजार रुपये वेतन मिळू शकत होते. मात्र देशसेवेनंतर गावाची आणि मातीची सेवा करण्यासाठी त्यांनी अवघ्या साडे सहा हजार रुपये मानधनावर पोलीस पाटलांची नोकरी स्वीकारली. विनोद बोरसे यांनी आफ्रिकेत कांगो येथे होणाऱ्या दंगलीत भारताकडून शांती सेनेत जाऊन शांतता निर्माण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याने युनोने त्यांना पदक देऊन गौरवले होते. तसेच काश्मीर मधील धोकादायक उरी क्षेत्रात देखील उत्कृष्ट सेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेती करणे सुरू केले. मंत्री अनिल पाटील यांनी विनोद बोरसे यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच सर्व नवनियुक्त पोलीस पाटलांचे स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, महेंद्र बोरसे व अन्य मान्यवर हजर होते.