अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथून रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली होती. त्याप्रकरणी मारवड पोलिसांच्या पथकाने आरोपीस जेरबंद केले आहे.
कळमसरे येथील शेतकरी हेमंत काशिनाथ चौधरी यांचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर हे रोटाव्हेटरसह गावातील रवींद्र कोळी यांच्या घरासमोर दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी लावले होते. दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता सदर ट्रॅक्टर लावलेल्या जागी दिसून आले नाही म्हणून परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. सदर ट्रॅक्टर चोरी झाल्याची खात्री झाल्याने हेमंत चौधरी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर चोरुन नेल्याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सपोनि शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोना सुनील तेली यांनी तपास केला असता गुप्त माहितीचा आधार घेत आरोपी शिरपूर येथे ट्रॅक्टर विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्याने पोना सुनील तेली, पोकॉ उज्वल पाटील हेकॉ सचिन निकम यांच्या पथकाने शिरपूर येथे आरोपीस ताब्यात घेतले असून तुषार शालिग्राम कोळी (वय 28) रा. म्हळसर असे आरोपीचे नाव आहे. त्याने सदर ट्रॅक्टर मनमाड येथील एकास विकले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीसह ट्रॅक्टर ही ताब्यात घेतले आहे. आरोपीस ९ रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.