जीवितहानी टळली मात्र दोन कुटूंब आली उघड्यावर…
अमळनेर:- तालुक्यातील सात्री येथे अतिवृष्टी झाल्याने ज्ञानेश्वर बाबूलाल बोरसे व छबिलाल रजेसिंग भिल यांची दोन घरे पडल्याने आजच दोन्ही कुटुंब बेघर झाली आहेत.
सात्री येथील ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील हे अल्पभूधारक शेतकरी असून ती जमीन निम्न तापी प्रकल्प मध्ये बुडीत क्षेत्रात गेली आहे. तिची तुटपुंजी किंमत मिळाली, घरात वयोवृद्ध विधवा आई व पत्नी आहे. अपंग मुलगा असल्याने पत्नीला दिवसभर त्या मुलाला सांभाळावे लागते. ज्ञानेश्वर हा स्वतः मधुमेहाचा रुग्ण असल्याने त्याला उपचारासाठी अमळनेर येताना सात्री गावाला रस्ता व पूल नसल्याने नदीतून उतरून यावे लागल्याने, त्याला विषारी काटा टोचला होता. त्यात पायाला गॅंगरीन झाले होते. तीन वर्षांपासून तो उपचार घेत आहे. तो काम करू शकत नाही अश्या परिस्थितीमुळे तो कर्जबाजारी झाला असून राहत्या घराचा मोबदला मिळेल या आशेने वृद्ध आई, अपंग मुलगा, पत्नी यांची उपजीविका भागवत आहे. दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे आज राहते घरही कोसळले. त्यामुळे ज्ञानेश्वर पूर्णपणे हतबल होवून गेल्याने रडू लागला.
छबिलाल रजेसिंग भिल या मजुराचे देखील घर कोसळले असून तो देखील बेघर झाला आहे. पोलीस पाटील विनोद बोरसे, सायिमल पावरा व विजय भिल यांनी मलबा काढण्यास मदत केली. मात्र दोन्ही घरातील सर्व साहित्य उघड्यावर पडले असून पोलीस पाटील विनोद बोरसे यांनी महसूल विभागाला माहिती कळवली आहे.
नशीब बलवत्तर चारही जण बचावले…
ज्ञानेश्वर यांचा मुलगा दिव्यांग व गतिमंद असून तो घराबाहेर पळाला. त्याला घरात आणण्यासाठी वृद्ध आई, पत्नी आणि ज्ञानेश्वर तिघेही घराबाहेर धावले अन इकडे घराचे धाबे धाडकन कोसळले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून चारही जण बचावले.