खापरखेडा बस सायंकाळी उशिरा सोडल्याने विद्यार्थ्यांचे झाले हाल…
अमळनेर:- एसटीमध्ये बसू दिले नाही म्हणून मंगरूळच्या मुलींना पाच किमी पायी जावे लागले तर खापरखेडा, पातोंडा, रुंधाटी, मठगव्हाण येथील मुलांना सायंकाळी उशिरा बस सोडण्यात आल्याने त्रास सहन करावा लागला.
बैलपोळ्याच्या सणाला शाळा महाविद्यालयांना सुटी होती. मात्र खाजगी क्लास व शिकवण्या सुरू होत्या. मंगरूळ येथील काही विद्यार्थिनी १४ रोजी सकाळी शिकवणीला बसने प्रवास करून अमळनेर आल्या होत्या. शिकवणी आटोपल्यानंतर मुली बसस्थानकावर आल्या असता त्यांना धुळ्याकडे जाणाऱ्या बस मध्ये चढू दिले जात नव्हते.
काही वाहकांनी मुलींना हात धरून खाली उतरवून दिल्याचा आरोपही मुलींनी केला आहे. मंगरूळ जाण्यासाठी मंगरूळ मार्गे जाणाऱ्या इतर खेड्यांवरील बस देखील लागत नसल्याने मुलींनी एसटीच्या काही कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता इतकी काय घाई आहे, लागेल थोड्या वेळात बस असे उत्तर देण्यात आले. घरी बैल पोळ्याचा सण आणि मुली वेळेवर आल्या नाहीत तर पालक चिंतेत पडतील, रागावतील या भीतीने अखेर मुलींनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. अमळनेर बसस्थानक ते मंगरूळ पाच किमी अंतर मुली पायी चालत गेल्या. मुलींना झालेल्या त्रासाबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील मुलांसाठी खापरखेडा बस लावण्यात आली नाही आणि लांब पल्याच्या बस मध्ये बसू दिले नाही म्हणून विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर सायंकाळी उशिराने एस टी प्रशासनाने गाडी सोडली.
एसटी महामंडळाच्या काही बसेस गणेशोत्सवासाठी रवाना करण्यात आल्याचे समजते. शालेय विद्यार्थ्याना सवलतीत पास आणि विद्यर्थिनींना मोफत प्रवासाची सवलत असल्याने एसटीच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो आणि उत्पन्न वाढावे यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते, म्हणून मुख्य मार्गावरील आणि लांब पल्याच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवास करणे टाळले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. एकीकडे पालक विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि दुसरीकडे उत्पन्न वाढीचे उद्दीष्ट या द्विधा मनस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे.
प्रतिक्रिया…
सुटीच्या दिवशी शालेय फेऱ्या बंद केल्या जातात. सुटीच्या दिवशी पास चालत नाही तरी आमचे कर्मचारी सहकार्य करतात. एसटी कर्मचाऱ्यांना बस थांबवण्याबाबत सूचना देण्यात येतील.
– इम्रानखान पठाण, आगार व्यवस्थापक अमळनेर