कळमसरे येथील शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे विद्युत तार अंगावर पडल्याने गायीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि १६ रोजी येथे घडली आहे.
तालुक्यातील कळमसरे येथील शेतकरी अशोक रघुनाथ पाटील यांच्या घरासमोर त्यांनी दोन गायी व दोन वासरे बांधलेल्या होत्या. जनावरे बांधलेल्या जागेवरून महावितरणच्या विद्युत तारा गेल्या असून त्यापैकी एक तार गाईच्या अंगावर पडल्याने विजेचा धक्का बसल्यामुळे गायीचा जागीच मृत्यू झाला. गाईच्या ओरडण्याचा आवाज आल्याने अशोक पाटील यांचे लहान भाऊ राजेंद्र पाटील व गल्लीतील काही लोक घराबाहेर धावले. त्यांनी तेथे पाहिले असता एका गायीचा जागीच मृत्यू झाला होता. महावितरण कार्यालयात फोन करत गावाची लाईट बंद करून उर्वरित एक गाय व दोन वासरांना त्या जागेवरून सोडविल्याने त्यांचा जीव वाचला. नुकसान भरपाईची मागणी शेतकरी अशोक पाटील यांनी केली आहे. कळमसरे येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी घटना स्थळी जात गायीचे शवविच्छेदन केले. राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत.