प्रशासनाला पुराचा नाही पत्ता, नदीकाठच्या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया…
अमळनेर:- पूर्व सूचना न मिळाल्याने बोरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नदी काठावरील नागरिक चांगलेच भांबावले होते. अमळनेर तालुक्यातील सात्री, कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द तर पारोळा तालुक्यातील भिलाली या गावांचा अमळनेरशी संपर्क तुटला होता.
बोरी नदीला मध्यरात्री अचानक पूर आल्याने बोरी नदी दुथडी वाहत आहे. रात्री प्रवाहाचे प्रमाण जास्त असल्याने भिलाली येथील पुलावरून पाणी वाहत होते. कन्हेरे येथील पुलावरून दोन तीन फूट पाणी वाहत असल्याने सकाळपर्यंत कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द या गावांचा संपर्क तुटला होता. त्या गावांना सडावन मार्गे पर्याय उपलब्ध होता.
मात्र अमळनेर तालुक्यातील सात्री गाव जणू काही शापित आहे. पूल आणि रस्ता नसल्याने या गावाचा संपर्क जगाशी तुटतो. नदीला पूर आल्याने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शाळेत पोहचू शकले नाहीत तर शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी अमळनेरला येऊ शकले नाही. ग्रामसेवक,तलाठी देखील गावात पोहचू शकले नाही. नदीचे पाणी कमी होत नाही तोपर्यंत गावाला कोणत्याच सुविधा मिळू शकत नाही.
पूर्व सूचना नसल्याने नदीकाठच्या गावातील नागरिक संतप्त…
प्रचंड पाऊस अथवा धरणाचे पाणी सोडल्यास नदी काठावरील लोकांना सतर्क करण्यासाठी संबंधित विभागाकडून अलर्ट दिला जातो,सायरन वाजवून सावध केले जाते. गावात दवंडी दिली जाते. मात्र या बाबत प्रशासनालाच काहीच माहिती नसल्याने नागरिकांनी नाराजी आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
म्हैस काढण्याच्या प्रयत्नात इसम गेला वाहून…
पारोळा तालुक्यातील भिलाली येथील कमलाकर हिंमतराव पाटील (वय ५५) हे बोरी नदी जवळ गेले असता पाय घसरून वाहून गेल्याची घटना आज दुपारी ४ वाजता घडली. सायंकाळी उशिरा धुळे येथून एसडीआरएफची टीम पोहचली असून रात्रभर शोधकार्य सुरू होते. पहाटे २०० फूट अंतरावर त्या इसमाची बॉडी सापडली असल्याची माहिती आहे.