अमळनेर:- येथील रहिवाशी व कोकणातील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक व संगणक विभागप्रमुख प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची आई ई टी (युके) अर्थात इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (इंग्लंड) च्या प्रथितयश व नामांकित आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्सच्या सहयोगी संपादकपदी तसेच संपादकीय मंडळावर निवड झाली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. इंग्लंडमधील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात आईईटी(युके) ही अभियांत्रिकी विज्ञान तंत्रज्ञान संशोधन व नवप्रवर्तन क्षेत्रातील १५० वर्षे कार्यरत असलेली मानांकित व अग्रेसरसंस्था असून जगभरात लाखो अभियंते शास्त्रज्ञ या संस्थेचे क्रियाशील सदस्य असून संस्थेचं तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्रात अनन्यसाधारण व मोलाचं योगदान आहे संस्थेतर्फे विविध विषयांवर संशोधन जर्नल्स, पत्रिका, नियतकालीक, मासिक पाक्षिक तसेच मुखपत्र आहेत. विज्ञान तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात सुमारे ५० जर्नल्स कार्यान्वित असून भरीव कामगिरी करत आहेत. संस्थेच्या वायरलेस सेन्सर्स अँड सिस्टिम्स तसेच सर्किट्स डिव्हाइसेस अँड सिस्टिमस या दोन अग्रगण्य व नामांकित जर्नल्सच्या सहयोगी संपादकपदी तसेच संपादकीय मंडळावर प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची प्रशंसनीयनिवड करण्यात आली आहे. सहयोगी संपादक व संपादक मंडळावर मोजक्याच व्यक्तींची निवड होत असून निवडीचे निकष खूप कडक असून त्या त्या क्षेत्रातील कामगिरी, अनुभव, अहर्ता, योग्यता व पात्रता तसेच योगदान इत्यादी गोष्टींचा बारकाईने व चिकित्सकपणे अभ्यास करून केली जाते. प्रा डॉ. शशिकांत पाटील यांना सुमारे २३ वर्षाचा शैक्षणिक अनिभव असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांवर क्रियाशील सदस्य तसेच अनेक आंतराष्ट्रीय समितीवर विविध पदांवर कार्यरत आहेत.अमळनेर तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथील रहिवाशी असून अमळनेर येथील निवृत्त शिक्षक एस बी पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून सर्वत्र कौतुक केले जात आहे