ह्या घडामोडी पडणार कोणाच्या पथ्यावर ?
निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्याने अनेकांचा हिरमोड..
अमळनेर:- येथील बहुचर्चित खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येई पर्यंत स्थगिती देत असल्याचे पत्र अध्यक्ष अनिल कदम यांनी काल प्रसिद्धीस दिले.
मतदानाच्या तोंडावर प्रांताधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची नव्याने परवानगी घेण्याचे पत्र दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा परवानगी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपण निवडणूक घेणे उचित होणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केल्याने या प्रक्रियेला स्थगिती देत असल्याचे अध्यक्ष अनिल कदम यांनी निवडणूक समितीला दिले आहे. ही प्रक्रिया पुढील आदेश होई पर्यंत पुढे ढकलली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुढील प्रक्रियेबाबत माहिती कळविली जाईल असे नमूद केले आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्याने अनेकाचा हिरमोड झाला असून ही बाब सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणारी असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. दरम्यान ह्या नाट्यमय घडामोडींनी तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.