अमळनेर:- तालुक्यातील दिव्यांगासाठी असलेला ५% निधी खर्च करण्यात काही ग्रामपंचायती नि:समर्थी ठरल्याचा प्रकार प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी माहितीच्या अधिकारातून समोर आणल्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती बरोबर जिल्हा परिषद देखील निसमर्थ ठरली आहे. सन २०१५ ते २०२१ पर्यंतच्या काळात दि.२५ जून २०१८ च्या शासन निर्णयाचे/नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून दुर्लक्ष देखील केले जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगांवर कोविड-१९ मूळे उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाचे कागदावर आदेश असूनही या आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे. जळगांव जिल्हा परिषद यांच्या कडून उल्लंघन करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कोणतीही कारवाई आजतागायत केली गेली नसल्याचा खुलासा माहितीच्या अधिकारातून समोर आला आहे. शासकीय विभागाकडून दिव्यांगांना सहानुभूती दाखवून जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात येतो. दिव्यांगांना विविध योजनेची माहिती देण्यात येते परंतु हे शेवटी देखावा म्हणून केला जात आहे असे या खुलाश्यामधून लक्षात येते. जळगांव जिल्हापरिषदेचा भोंगळ कारभाराबाबत जिल्ह्यातील दिव्यांगांकडून नाराजगी व्यक्त केली जात असून या निषेधार्थ लवकरच प्रहार संघटनेकडून मोठे आंदोलन करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सदरील झालेल्या प्रकारचा अहवाल राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे योगेश पवार यांनी सांगितले आहे.