समितीने वाचला स्टेशनवरील अनेक समस्यांचा पाढा…
अमळनेर : अमृत महोत्सवानिमिताने रेल्वे स्टेशन मध्ये आधुनिक बदल करण्याच्या निमत्तने अमळनेर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी पश्चिम रेल्वेचे डी आर एम वर्मा यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी स्टेशनवरील अनेक समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर समितीने मांडला.
डीआरएम वर्मा यांच्यासमवेत ७० अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा होता. अचानक विशेष वाहनाने त्यांनी अमळनेर भेट दिली. त्यावेळी रेल्वे समितीचे प्रीतपालसिंग बग्गा यांनी अमळनेर रेल्वे स्थानक आधुनिक करताना त्याला अमळनेरातील संत सखाराम महाराज, सानेगुरुजी, मंगळ मंदिर यांचा आकर्षक लूक देण्यात यावा, दोन्ही प्लॅट फॉर्म समोरासमोर करा, दोन्ही प्लॅटफॉर्म वर प्रवाश्यांसाठी ऊन आणि पाऊस यांच्यापासून बचावासाठी शेड करा, दोन नंबर प्लॅटफॉर्मवर पाणी आणि कॅन्टीन सुविधा नाही. त्यासाठी प्रवाश्यांना लांब अंतरावरून दादरा चढून एक नंबर प्लॅटफॉर्मवर यावे लागते. जवळच असलेल्या माल धक्क्यामुळे माल चढ उतार करताना धूळ व प्रदूषण होते त्याचा प्रवाश्यांना त्रास होतो. अमळनेरहून रेल्वेने पुणे जाता यावे यासाठी अमळनेर मार्गे पुणे रेल्वे सुरू करण्यात यावी, प्रवाश्यांना शहरातून, बस स्थानकवरून लघु अंतराने रेल्वे स्टेशन वर येता यावे यासाठी ग्रामीण रुग्णालयाजवळून रस्ता करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. यापूर्वी केलेल्या मागणीनुसार आरक्षण फॉर्म मराठीतून उपलब्ध करून साफसफाई देखील करण्यात आली. यावेळी स्टेशन अधीक्षक शिंदे, आरपीएफ चव्हाण यांच्यासह रेल्वेचे विविध अधिकारी हजर होते.