
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पातोंडयाला विचारांचा जागर…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्यांचे क्रांतिकारी विचार मनामनात जोपासले पाहिजेत. केवळ जयंतीदिनी महापुरुषांची जयंती साजरी न करता त्यांचा जन्मोत्सव नाचून नव्हे तर वाचून साजरा करा असे आवाहन व प्रबोधन प्रोटॉनचे कार्याध्यक्ष तथा व्याख्याते सतीश शिंदे यांनी पातोंडा येथे निळे वादळ युवक मंडळातर्फे श्री संत शिरोमणी रोहीदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्मोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित समाज बांधवांना केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला व्याख्याते सतीश शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.तदनंतर उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करून व्याख्यानमालेला सुरवात करण्यात आली. सतीश शिंदे यांनी आपल्या व्याख्यानात संत रोहिदास, शिवाजी महाराज, गाडगे महाराज, डॉ.बाबासाहेब यांच्या जीवन चरित्रावर त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्य, त्यांचा संघर्ष यावर प्रबोधन केले. व्याख्यानात जातीयव्यवस्था ही आपल्या जातीयतेला लागलेली कीड असून आपल्या खऱ्या रक्ताचे वारसदार बेईमान असू शकतात पण विचारांचे नसतात. आपल्या इतिहासातून आपण काय शिकलो पाहिजे,समाजात एकोपा कसा निर्माण होईल यावर भर दिली पाहिजे. पण प्रत्येक समाजातील घटकाने प्रत्येक महापुरुषांना व संताना समाजासमाजात वाटून नेले आहे. सर्व संतांचे विचार व त्यांनी केलेलं कार्य हे केवळ विशिष्ट समाजापुरते नसून संपूर्ण अठरापगड जातीला धरून आहे. या महापुरुषांना जातीत आणण्याचे काम आपल्याच मानवीय जातीने केलेले आहे. राष्ट्रसंत हे जन्माने नाही तर कर्माने अमर आहेत. त्यांचा विचारांचा वारसा आपण सतत जपला पाहिजे. समाजाला लागलेली कीड ही नष्ट केली पाहिजे. ऐसा चाहू मै राज, छोटे -बडे सबन को मिले अन्न, तब रैदास रहे प्रसन्न अशा अर्थबोध उदाहरणातून संत रोहिदास यांच्या कार्याची महती सांगितली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गाडगे महाराज, शाहू महाराज आदीं महापुरुषांच्या कार्याचे उदाहरणे देऊन उपस्थित समाज बांधवांना आपल्या वाणीतून प्रबोधन केले. यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकेश सावकारे, सरपंच भरत बिरारी,ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे, सोपान लोहार, प्रदीप लोहारे, प्रवीण लाड,नितीन लाड,रमेश कुंभार, राजेंद्र यादव,रमेश संदानशिव,महेंद्र पाटील,किरण शिरसाठ,भुरा संदानशिव, विजय सोनवणे,सुपडू संदानशिव, रोहित संदानशिव, रणधीर संदानशिव,किशोर सोनवणे, शशिकांत संदानशिव, अमोल संदानशिव,चंद्रकांत सोनवणे, पंकज वाल्हे,रुपेश सपकाळे, आशुतोष संदानशिव, सागर सोनवणे, योगराज संदानशिव, जिशान, सद्दाम खान, शाहरुख पटवे, जुनेद, प्रशांत गव्हाणे, रोहित बैसाने,समाधान संदानशिव, केतन ढिवरे, सुयश वाघ, संदीप बैसाणे सह गावातील सर्व समाजबांधव, युवक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शिक्षक विलास चव्हाण यांनी केले.







