
अमळनेर:- शहरासह ग्रामीण भागात नंदी दूध पित असल्याची अफवा पसरल्याने रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये गर्दी झाली होती.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात काल दिवसभर अनेक ठिकाणी नंदी पाणी व दूध पित असल्याचे व्हिडिओ पसरू लागलें. तेव्हापासून अनेक जण नंदीला पाणी पाजण्यासाठी मंदिरात गर्दी करू लागले. तालुक्यातील अनेक गावातून हि असे व्हिडिओ समोर आले आहेत. रात्री उशिरापर्यंत अनेकांनी मंदिरात गर्दी केली होती. आतातर राज्यभरात या प्रकारचे लोण पसरले असून अनेक ठिकाणावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करण्यात येत आहेत. मात्र सरफेस टेन्शन मुळे हा प्रकार होत असल्याचे अनिस तर्फे सांगण्यात आले आहे. वातावरणात झालेला बदल याला कारणीभूत असतो. विषम वातावरणामुळे दिवसा उष्ण व रात्री थंड हवेने मूर्ती ज्या सच्छिद्र काळ्या दगडा पासून बनलेल्या असतात तिच्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन हवेची पोकळी निर्माण होते त्याने नंदी/मूर्ती पाणी किंवा दूध स्वतःकडे आकर्षित करते. जेव्हा मूर्तीतील (दगडातील) छिद्रे पाण्याने भरले की ते पाणी / दूध पिणे ( शोषणे ) बंद करते. यामुळे असा प्रकार घडत असल्याचे सांगण्यात आले आहे.







